अभ्या नागपूरकर
Nagpur
असं वाटत अगदी परवाचीच गोष्ट असावी, पण झालीत चार-पाच वर्ष. नागपूरच्या धडधडत्या हृदयस्थानी असलेली धंतोली. पूर्वी पान आणि हल्ली खर्रा खून पिचकार्या मारण्याची सर्वमान्य जीवनपद्धत अंगीकारलेले हे शहर. अशाच एका बिझी पानठेल्या समोरून (अचानाक पिचकाऱ्यापासुन) बचावात्मक पावलं टाकत मी चाललो होतो. तोच ‘अबे साल्या’ अशी हाक मलाच भेदून गेली. पाहून चमकलो, हाक मारणारा माझा वीस वर्षापूर्वीचा बारावीतला मित्र अभ्या म्हणजेच अभिजित नागपूरकर होता. नागपूरच्या शिवाजी सायन्स कॉलेजचे दिवस, मी आणि अभ्या, अभ्याच्या मास्तर असलेल्या वडिलांची खटारा ( असं म्हणू नये पन ती तशीच होती ) सायकल…. असा तो रम्य भूतकाळ माझ्या पुढे उभा होता.
‘अनेस्थेटीस्ट’? अबे अभ्या तू इतका हुशार होता, जी. एम. सी. त एम. बी. बी. एस. ला गेलास इतकच ठाऊक होत रे मला. मग हे अनेस्थेटीस्ट वगैरे काय रे? माझ्या या परग्रहावरून झालेल्या चौकशीवर अभय फक्त ‘ चल यार चहा घेवू!’ इतकच म्हणाला.
अभ्या अभ्यासात माझ्या पेक्षाही हुशार होता. बडबडा पण अतिशय रंजक. त्याची कंपनी नेहमी उत्साह आनंद द्यायची. अभ्या तबला वाजवायचा, शाळेत वादविवाद, वकृत्व स्पर्धात चमकायचा. उत्तम चित्रकार आणि नट ही होता. असा हा बहुरंगी गुणी मित्र चांगला डॉक्टर असूनही सुंगणीतज्ञ किंवा अनेस्थेटीस्ट का झाला हे कोडं पुढला काही काळ मला सुटलं नाही.
नागपुरात आमचा बारावीचा ग्रुप पुन्हा एकवटू लागला. आम्ही सगळे अभ्याला डॉक्टर असे म्हणू लागलो. पण तो नेमका कशाचा डॉक्टर हे गावी नसल्याने आम्ही त्याचे फक्त सल्लेच घ्यायचो. अभ्या डॉक्टर आहे याचा साधा वासही त्याच्या राहाणीमानावरून यायचा नाही. सदैव जीन्स, टी-शर्ट घालणारा. अघळपघळ, वाटेत भेटला की स्वतःच हाक देणारा. कुठूनही न सुटलेला, बांधेसूद, पूर्णतः निर्गवी, कधी स्कूटर, कधी कार तर कधी झपाझपपावलं टाकत अतिशय घाईत भेटलेला, असाच असायचा.
आणि असाच ‘तो’ रवीवार उजाडला. आम्ही सहा मित्र व्ही. एन. आय. टी. त मार्निग वॉक करून तर्री-पोहा आणि चहाचा आस्वाद घेत होतो आणि अचानक एक धडाका झाला. आमच्या समोर मध्यमवयीन दुचाकीस्वार दाम्पत्याला एका सुसाट दुचाकी (बाईक) स्टंटबाजाने जोरात धडक दिली. बाईकस्वार ही पडला पण लंगडत – लंगडत सावरला आणि धूम पळाला. पण जोडपं मात्र अस्ताव्यस्त रस्त्यावरच पडलं होतं. महिलेचा हात मोडला होता व गुडघ्यांना खरचटलं होतं. माणूस मात्र गंभीर जख्मी होता.
‘अनेस्थेटीस्ट’ असलेला आमचा अभ्या हा नेमक्या देवाचा अवतार आहे याचा त्या दिवशी आम्हाला साक्षात्कार झाला. अभ्या सर्व सूत्र क्षणात आपल्या हाती घेतलीत. जमिनीवर आपटलेले गृहस्थ गेलेतच कि काय असं आम्हा सर्व बघ्यांना वाटल. पण अभ्या सरसावला, त्याने मानेची नाडी पाहीली, आणि तात्काळ छाती दाबू लागला. मधे मधे तोंडाने त्या गृहस्थाच्या तोंडात श्वास देऊ लागला. अभ्या दोन चार मिनिटे अव्याहतपणे हे करत होता. आणि चमत्कार झाला ते गृहस्थ हालचाल करू लागलेत. एक प्राण वाचला. त्या दाम्पत्याला आम्ही एका हॉस्पिटलात भरती केले. दोघेही भेदरलेले भांबावलेले होते. ओळख करून देणे, आभार प्रदर्शन करणे इ. इ. कुठलेही कार्यक्रमझाले नाहीत. अभ्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण परिपूर्णता आणि आनंदाचा भाव होता, पण कर्तेपणाचा अहंकाराचा लवलेशही नव्हता. आम्ही बाकी मित्र मात्र देव दिसल्याच्या जल्लोषात होतो. सारंग दाबडे या मित्राने रात्रीच्या सावजी पार्टी चे एलान केले व दिली सुद्धा. अभ्या दिलखुलासपणे सामील झाला. कर्म करावे पण कर्तेपणाचा भाव असू नये वगैरे ग्यान अनेक गुरु बाबांनी पाजले होते. ते थिअरॉटीकल वाटायचं. पण आज ते खरखुर तो ‘खुर’ आणि रस्सा होरपत माझ्या बाजूला बसलं होतं.
पुढील चार वर्षात या अनेस्थेटीस्ट देवाने अनेक साक्षात्कार दिलेत. कुण्याच्या आईच्या कमरेचे हाड मोडले. कुण्याच्या बायकोचे सिजीरीन, कुठे लहानग्याचा हर्निया तर कुठे आजोबा आय. सी. यु. त. ! प्रसंग अनेक पण अभ्याचा प्रभाव सर्वत्र. नागपुरातले ख्यातनाम नामवंत हाडरोग, हुदयरोग, कान-नाक-घसा, गायनिक कुणीही तज्ञ अभ्याचा उल्लेख केल्यास अत्यंत आदराने, “नागपूरकर सर” असा प्रतिसाद देत. “आम्हाला नागपूरकर सरांचाच आधार आहे रे बाबा” असं माझ्या वडिलांची प्रोस्टेट काढणाऱ्या सर्जनेही म्हटल्याचा मला स्पष्ट आढवत.
आमच्या एलाईट बारावीच्या वर्गातली बरीच मंडळी प्रथितयश आणि मातब्बर आहेत. बहुतेक इंजिनिअर, एक सी. ए. आणि पाच डॉक्टर आणि इतरही सगळेच सुस्थितीत आहेत. यश आपल्यासोबत ‘अहंकारा’ च फ्री प्याकेज घेऊन येत फार कमी खऱ्या अर्थानं ‘बाप’ असलेली माणसं हा मुफ्त का ‘समोसा’ बांसी हे ओळखतात, अभ्या त्यातलाच.
अॅनेस्थेशियालॉजीस्टच ज्ञान, गुण, त्यांत वैद्यकशास्त्रातल अनमोल योगदान, डॉक्टरांच्या समूहातील त्याचं ग्लॅमर नव्हे ओरा किंवा तेजस्वी वलय हे सगळ अस्मादिकांस अभ्या मुळे कळल. तो, ‘अनेस्थेटीस्ट झाला’ हे पहिल्यांदा कळल तेंव्हा, त्या मानाने (डॉक्टरांच्या) कुठलातरी कनिष्ठ प्रकारचा डॉक्टर झालाय अस वाटून उगाचच मूर्खपणे सुखावलेला माझा अहंभाव त्याचं पूर्ण विराटरूप पाहून आतापर्यंत शरमिंदा झाला होता. आज आमच्यापैकी कुणालाही ‘अनेस्थेटीस्ट’ भेटलेत कि मनापासून आदर वाटतो आणि डोळ्यापुढे उभा ठाकतो, कॉमन मन चा बावळा वेश धारण करूनही अंतरी नाना कळा असलेला चतुरस्त्र दशावतारी अभ्या.
पंकज माचवे