स्वातंत्र्यसूर्य सुभाषचंद्र
Consultant Anesthesiologist, Nagpur
स्वातंत्र्यसूर्य सुभाषचंद्र
आपल्या अडतीस कोटी देशबांधवांना स्वातंत्र्याची पहाट पाहता यावी यासाठी आपल्या उभ्या आयुष्याचा होम मांडणार्या नेताजींबद्दल व या युगानुयुगांतून एखादेवेळीच जन्मणार्या महानायकाच्या एका शब्दाखातर आपल्या सर्वस्वाची होळी करणार्या ‘आझाद हिंद’च्या सैनिकांबद्दल सगळ्यांनी थोडेफार ऐकले जरी असले तरी त्यांच्या दैदिप्यमान,संघर्षमय व युगायुगांना प्रेरित करणार्या इतिहासाबद्दल मात्र फारच थोड्या लोकांना माहिती आहे. नेताजींचे चरित्र व इंफाळ,कोहीमा,ब्रह्मदेशाच्या रानावनांत,तेथील दर्याखोर्यांत,ईरावती-चिंदवीन या महाकाय नद्यांच्या व पावसाच्या रौद्रतांडवात,डिकी माउंटबॅटन व स्टीलवीनच्या फौजांना पळता भुई थोडी करुन परंतु अखेरी नियतीच्या पूढे नतमस्तक होवून अनेक अनाम,अज्ञात वीरांनी केलेल्या बलिदानाची गाथा अधिकाधिक लोकांना माहित व्हायलाच हवी. म्हणून हा लेखनप्रपंच.
आजच्या ओरीसातील कटक नगरीत जन्मलेले सुभाषचंद्र बालपणापासूनच अत्यंत निर्भीड व साहसी स्वभावाचे व कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी होते.स्वामी विवेकानंदांच्या वाड्मयव्योमात लहानपणापासून केलेल्या विहारामुळे महाविद्यालयीन वयातच रामकृष्ण मठाचा संन्यासी होण्याची उचल त्यांच्या मनाने खाल्ली.परंतु सर्वच महापुरुषांप्रमाणे त्या त्या काळाची गरज ओळखून,युगधर्म म्हणून स्वतःच्या वैयक्तिक मुक्तीची आस सोडून त्यांनी करोडो भारतवासीयांना परदास्याच्या शृंखलांतून मुक्त करण्यास्तव देशसेवेचे असीधाराव्रत (तलवारीच्या धारेवर चालण्याचे व्रत) हाती घेतले.
आय्.सी.एस्.च्या परिक्षेत चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण होवूनही ब्रिटीशांच्या नोकरीवर लाथ मारुन सुभाषबाबूंनी स्वातंत्र्याच्या रणयज्ञात उडी घेतली.आपल्या देखण्या व अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्वामुळे,अलौकिक बुद्धिसामर्थ्यामुळे, ओजस्वी वैखरीमुळे, अचाट धाडसामुळे व निर्व्याज,निरपेक्ष राष्ट्रभक्तीमुळे सुभाषबाबू लवकरच भारतवासीयांच्या गळ्यातले ताईत व काॅन्ग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वातील एक बनले. मिळमिळीत व तेजोभंग करणार्या अहिंसेच्या तत्वाला विरोध करुन, पट्टाभी सीतारामैय्यांचा पराभव करुन सुभाषबाबू काॅन्ग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्रिपूरी अधिवेशनात निवडून गेले.परंतु मूलतःच स्वाभिमानी असलेल्या सुभाषबाबूंनी तत्कालीन काॅन्ग्रेसच्या मोठ्या नेत्यांसोबत मतभेदांमुळे मनभेद नकोत म्हणून काॅन्ग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.पुढची रणनिती ठरविण्यासाठी अनेक थोरामोठ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. मागावरच असलेल्या ब्रिटीश सरकारने संधी साधून त्यांना गृहकैद केले.परंतु या सिंहाच्या छाव्याने शिवाजी कशास्तव वाचला होता ? साक्षात औरंगजेबाच्या हातावर तुरी देवून पळणार्या शिवरायांप्रमाणे सुभाषबाबूही इंग्रजांच्या कडक पहार्यातून निसटलेच.कधी पठाण,कधी अफगाण तर कधी ओरलॅन्डो मॅझ्युटा या नावाने ईटालियन माणसाचा वेष घेवून सुभाषबाबू इटली व जर्मनीस पोहोचलेच.परंतु मुसोलिनी व हिटलरकडून हवा तो प्रतिसाद न मिळाल्याने अतिशय धोकादायक व जीवावर बेतेलसा पाणबुडीचा प्रवास करुन हा संन्यस्त योद्धा जपानमध्ये पोहोचला.
आणि कलीयुगातील श्रीराम आपले हनुमान,सुग्रीव,अंगद,जांबुवंत,नल,नील गोळा करु लागला. राशबिहारी बोसांसाख्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सहगल,ढिल्लन,शाहनवाज खान,कॅप्टन लक्ष्मी आदिंसह लक्षावधी देशभक्तांची फौज बांधून,’आझाद हिंद फौज’ बांधून,’राणी लक्ष्मी रेजिमेंट’ ही जगातील पहिली महिला रेजिमेन्ट बांधून,”कदम कदम बढायें जा…’ च्या तालावर हा महावीर निघाला.सिंगापूर,ब्रह्मदेश ओलांडून त्याने हां हां म्हणता म्हणता अंदमान-निकोबर बेटे जिंकलीही व त्यांना ‘शहीद’ व ‘स्वराज्य’ ही हिंदी नावेही दिली. ‘चलो दिल्ली’च्या नार्यावर चालणारे ‘आझाद हिंद’चे सैनिक आता येतीलच व आपल्याला परकीय जोखडातून मुक्त करतीलच या आशेवर करोडो भारतवासी पूर्वेकडे डोळ्यांत प्राण आणून वाट पहात होते.पण…..पण नियतीच्या मनात काही वेगळेच शिजत होते.
इकडे द्वितीय महायुद्धाचे पारडे फिरले.इटली,जर्मनी माघार घेवू लागले व जपानलाही सुभाषबाबूंना मदत करणे अशक्य होवू लागले.पण अशाही परिस्थितीत माघार घेतील ते नेताजी कसले?
प्रचंड पाऊस,धान्य व युद्धसामुग्रीचा अभाव व वरुन आग ओकणारी सेनापती माऊंटबॅटनची विमाने या विपरित परिस्थितीतही सुभाषबाबूंची सेना अभंग आवेशाने लढत राहिली.परंतु कल्पांतसिंधूसमोर गलबत किती काळ टिकाव धरणार? वादळाशी दिवा किती काळ लढणार ? शेवटी…होवू नये तेच झाले.आझाद हिंद सेनेचा पराभव झाला.
पण हा तर फक्त एका लढाईतील पराभव होता.युद्ध तर सुरूच होते.माघार घेतील तेही नेताजी कसले? ‘पुनश्च हरि ॐ’ म्हणून रशियाच्या मदतीने काही मार्ग निघतो कां,हे बघण्यासाठी नेताजी फोर्मोसाच्या विमानतळावर विमानात बसले अन्………
…….
अशा या युगानुयुगांतून क्वचितच जन्म घेणार्या श्रीकृष्णाला,चंद्रगुप्ताला,विक्रमादित्याला,राणा प्रतापाला,शिवाजीला….अर्थात राष्ट्रगौरव नेताजी सुभाषचंद्र बोसांना कोटी कोटी कुर्निसात !!!
बदलत्या कालप्रवाहात,नवनवीन तंत्रज्ञानाचा व उपलब्ध साधनांचा वापर करुन हे क्रांतीकवन आपण सतत गायलाच हवे.या ‘स्वातंत्र्यसूर्या’च्या,या ‘सुभाषचंद्रा’च्या चरित्ररुपी सोलर एनर्जीतून काही नवीन सेल्स नक्कीच चार्ज होतील व आपल्या कर्तृत्वाच्या लख्ख प्रकाशाने आसमंत उजळून टाकतील,या आशेसह लेखणीस पूर्णविराम देतो.इत्यलम्!
‘ध्येयमंदिर की दिशा में पग सदा बढते रहे।
हृदय में तव स्मृतिलता नित पल्लवित होती रहे।”
●●●●●●●●●●●●●●●●●●●
-डाॅ.सचिन जांभोरकर,
नागपूर.