बाबूजी : एक व्रतस्थ तपस्वी
बाबूजी उपाख्य सुधीर फडके- मराठी गीत-संगीतसृष्टीस पडलेले एक गोड स्वप्न! गेल्या तीन पिढ्यांपासून मराठी भावविश्व समृद्ध व नादमधूर करणार्या बाबूजींच्या व्रतस्थ व ध्येयासक्त जीवनाचा नवीन पिढीस परिचय व्हावा, एतदर्थ ही लेखमाला!
‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’
बाबूजींच्याच एका गाण्याच्या शब्दांत थोडासा फरक करुन त्यांच्या चरणी मागणे मागतो…
तिन्हीं लोक आनंदाने,
भरुन जावू दे!
तुझे गीत गाण्यासाठी
शब्द लाभू दे!
पौर्णिमा शब्दांची माझ्या
तूला वाहू दे!
चांदण्यात आनंदाच्या
मला न्हावू दे!
आजकालच्या गल्लाभरु चित्रपटांवर वाढणार्या आणि त्या चित्रपटांतील नट-नट्यांचे जीवन म्हणजेच ‘हिरो’चे जीवन समजणार्या आजच्या पिढीला चित्रपटसृष्टीत राहूनही कुणी असे उच्च नैतिक,राष्ट्रभक्तीयुक्त व व्रतस्थ जीवन जगू शकतो,हे ऐकून आश्चर्य वाटेल. नितीमूल्यांवर निष्ठा असेल, संस्कारांचे बाळकडू असतील अन् मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित असेल तर परिस्थिती कितीही बिकट असो अन् क्षेत्र कुठलेही असो, जीवनात एक उच्च, उदात्त, उन्नत आदर्श निर्माण करता येतो; याचे बाबूजींचे आयुष्य म्हणजे चालतेबोलते उदाहरण.
२५ जुलै १९१९ ला जन्मलेल्या बाबूजींचे शैशव कोल्हापूरात गेले. त्यांचे खरे नांव रामचंद्र विनायक फडके. कोकणातील मूळ वाडाफणसे या गावचे हे फडके कुटुंब. पूढे कधीतरी कोल्हापूरात येवून वसले. गीतकार व संगीतकार म्हणून नावारुपास येण्यापूर्वी मात्र बाबूजींना दुर्दैवाचे अक्षरशः दशावतार पहावे लागले.
दैव ज्यात दुःखे भरता
दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा
या गीतरामायणातील त्यांच्याच गीतातील शब्दांना सार्थ ठरवणारे सुख-दुःखांच्या लाटांवर सतत हेलकावे खाणारे असे त्यांचे आयुष्य राहिले.लहानपणीच आई देवाघरी गेली. वडील तसे पेशाने वकील. पण पत्नीच्या निधनाने त्यांनी हाय खाल्ली आणि त्यांचे व्यवसायातील लक्षच उडाले. मग कुटुंबाच्या भाळी आले अठराविश्वे दारिद्र्य. थोरल्या भावाला शुगर-मिलमध्ये तुटपुंज्या पगाराची नोकरी धरावी लागली. स्वतः संगीत शिक्षण घेत असलेल्या बाबूजींनी पंडितराव ठाणेकर यांच्या ‘श्रीकृष्ण हार्मोनियम क्लास’मध्ये शिकवणी घेणे सुरु केले. दरम्यान कोल्हापूर, पूणे, मुंबई आदि गावांमधून ‘पोटासाठी दाही दिशा,अम्हां फिरविसी जगदीशा’ झाले.कुठेही काही थार मिळेना. परंतु या दुर्दैवाच्या व दारिद्र्याच्या काळातही बाबूजींची ध्येय, तत्व व मूल्यांवरची निष्ठा, वागण्यातले मार्दव आणि संगीतावरील भक्ती अणूमात्रही कमी झाले नाही. त्यांच्याच आणखी एका गीतातील शब्दांत त्यांचे वर्णन करता येईल,
विमोह त्यागूनि कर्मफलांचा सिद्ध होई पार्था!
कर्तव्याने घडतो माणूस,जाणून पुरुषार्था.
दारिद्र्याचे चटके खात बाबूजींची वाटचाल सुरु होती. अनेकदा आशेचा किरण दिसायचा, नवीन वाटचाल सुरु व्हायची पण नियती असं काही फासे फेकायची की पुनः सारे शून्यवत् होवून जाई.१९३०-३१ सालची गोष्ट असेल. अब्दुल करीम खाँसाहेबांसमोर गाण्याची स्पर्धा होती. यात लहानग्या रामने मूलतानी रागातील एक चीज गावून दाखवली व प्रथम पारितोषिक पटकावले. यानंतर कोलम्बिया म्युझिक कंपनीने त्यांची ध्वनिफित (ऑडिओ कॅसेट) काढायचे ठरवले. मात्र ‘यशाची हवा या मुलाच्या डोक्यात जाईल’ असा विचार करुन त्यांचे गुरु- बाबूराव गोखले यांनी परस्पर नकार कळविला. अन्यथा कदाचित त्याचवेळी एक नवीन कुमारगंधर्व महाराष्ट्राला मिळाला असता. पण नियतीपूढे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा‘ हेच खरे.
पुढील पाच-सहा वर्षे परिस्थितीशी झगडतांना रामला वडिलांचा मृत्यूही पचवावा लागला आणि कोल्हापूर सोडावे लागले. १९३७ मध्ये जमखंडीच्या मामाचा निरोप आला कि दस्तुरखुद्द अब्दुल करीम खाँसाहेबांनी रामला शिकायला बोलावले आहे. परंतु राम निघण्यापूर्वी पाच-सहा दिवसांतच वर्तमानपत्रात बातमी आली-‘दौर्यावर असतांनाचा खाँसाहेबांचा हृदयविकाराने मृत्यू झाला.’ झाले….पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
कधी बहर,कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे
अशी त्यांच्याच गीतात वर्णिल्याप्रमाणे त्यांची अवस्था झाली. १९३७-३८ च्या काळात ते मुंबईला आपल्या रायकर या मित्राच्या घरी आश्रिताप्रमाणे राहिले. पण मानी मनाला ते पटेना. तेही घर सोडले. कधी भाजी वीक, कधी चहा वीक असे करता करता आपली वाद्येही त्यांना वीकावी लागली. शेवटी मुंबई सोडून नाशिकला आले. परंतु कुणीही त्यांचं गाणं केलं नाही. खिश्यात केवळ अकरा आणे. अशा वेळी त्यांच्या एका संघ स्वयंसेवक मित्राने मालेगावच्या एका काळे नामक व्यक्तीचा संदर्भ दिला. काळेंनी मालेगावात सुधीर फडकेंचा जाहीर कार्यक्रम केला. चक्क पाच रुपये बिदागीही मिळाली. आपल्या ‘जगाच्या पाठीवर’ या आत्मचरित्रात बाबूजी लिहीतात, “त्या दिवशी तो कार्यक्रम झाला नसता, तर मी भूकेने मरुन गेलो असतो, गुन्हेगार झालो असतो नाहीतर चक्क आत्महत्या केली असती.”
ईथून मात्र बाबूजींच्या आयुष्याच्या एका नवीन पर्वाचा प्रारंभ झाला.
“उघड दार देवा आता”
बाबूजींच्या गाण्याचा जाहीर कार्यक्रम मालेगावात झाला आणि त्यांच्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरु झाले. मालेगाव, धूळे, धरणगाव, इंदोर, देवास, बिलासपूर, कानपूर, आग्रा आदि अनेक शहरांत बाबूजींना कार्यक्रमासाठी आमंत्रणे येवू लागलीत. कोलकाताच्या ‘इंडिया रेकाॅर्डिंग कंपनी’तून त्यांना ध्वनिमुद्रिकेच्या रेकाॅर्डिंगचे आमंत्रणही आले. रसिकांचे उदंड प्रेम सगळीकडून त्यांना मिळत होते. आता आपण कोलकात्यात स्थिरावू असे त्यांना वाटत असतानाच पुनः नियतीने कूस बदलली. लहानपणी त्यांना सांभाळणार्या दादाची तब्येत अतिशय खराब असल्याचे त्यांना कळले व ते कोल्हापूरास निघाले. काही दिवसांनी दादाची तब्येत तर सुधारली पण बाबूजी स्वतःच आजारी पडले. आजारपणात दीड महिना निघून गेला आणि दरम्यान कोलकात्याहून निरोपही आला की रेकाॅर्डिंग संपली असून बाबूजींची तिथे आता काही गरज नाही. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कोल्हापूराहून उज्ज्वल भविष्याच्या आशेने निघालेले बाबूजी पुन्हा कोल्हापूरातच पोहोचले आणि आता पूढे काय, हा प्रश्न आवासून उभा होता. बाबूजी देवाची आणि दैवाची जणू कळवळून करुणा भाकत होते-
‘उघड दार देवा आता!उघड दार देवा!!’
आणि देवाने व दैवाने दरवाजा उघडला. कोल्हापूरात त्यांना काही मित्र मिळाले.आणि यातीलच एक मित्र असा मिळाला ज्याच्यासोबत मिळून बाबूजींनी मराठी भावमनावर चिरकाळ साम्राज्य गाजविणारा ‘गीत-रामायण’ रुपी इतिहास रचला. हा मित्र होता ग.दि. माडगूळकर उपाख्य गदिमा.
कोल्हापूरच्या या मित्रांनी गदिमांचे शब्द व बाबूजींचे संगीत व गायन असणारी रॅकाॅर्ड काढली व बाबूजींची पहिली रेकाॅर्ड तयार झाली.यादरम्यान आणखी एक आनंदाची गोष्ट घडली. कोल्हापूरात त्यावर्षी आचार्य अत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा.मराठी साहित्य संमेलन होते.त्या साहित्य संमेलनात बाबूजींसाठी गायनाचे निमंत्रण त्यांच्या एका मित्राने मिळवले. गदिमांचीच एक कविता बाबूजींनी गाऊन दाखवली.त्याला अनेक ‘वन्स मोअर’ मिळाले आणि साहित्य संमेलन असल्यामुळे बाबूजींचे व गदिमांचे नाव रातोरात चोहीकडे गाजले.
त्यानंतर ‘गदिमा व बाबूजी’ या जोडगोळीने असंख्य चित्रपटगीतांचे दान मराठी रसिकांच्या पदरात घालून महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांचे भावविश्व समृद्ध व मधूर केले.१९४६ साली संगीतबद्ध केलेला ‘गोकुळ’ हा बाबूजींच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटगीतांनादेखील बाबूजींनी संगित दिले.’भाभी की चूडिया’ मधील ‘ज्योती कलश झलके’ किंवा किशोरदांच्या आवाजातील ‘खूश हैं जमाना,आज पहिली तारीख हैं’ ही गीते बाबूजींनीच संगितबद्ध केलेली. पण त्यानंतर मराठी गानसृष्टीच बाबूजींनी अधिक जवळ केली.सुमारे १११ चित्रपटांना त्यांनी संगित दिले. चित्रपटगीतांखेरीज अनेक भावगीतेही बाबूजींनी गायलीत. ‘तोच चंद्रमा नभांत’, ‘धुंदी कळ्यांना,धुंदी फुलांना’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘देहाची तिजोरी’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘एकवार पंखावरुनि फिरो तुझा हात’ यांसारख्या असंख्य गीतांच्या अमृतवर्षावाने आजही मराठी कान तृप्त होताहेत व मराठी माणूस चांदण्यात न्हावून निघतोय. जवळजवळ पन्नास वर्षे मराठी गीत-संगीतसृष्टीचे ते अनभिषिक्त सम्राट होते.
दरम्यान सहगायिका ललिता देऊळकर यांच्यासोबत बाबूजी रेशीमबंधात अडकले.त्यांच्या विवाहातील मंगलाष्टके साक्षात महम्मद रफींनी गायली होती.काय दृष्य असेल ते.
‘स्वयें श्री बाबूजी ऐकती,
रफी साहेब मंगलाष्टके गाती.
यानंतर १९५५-५६ यावर्षी आकाशवाणीवर छप्पन आठवडे ‘गीत-रामायण’ रुपी जो इतिहास घडतांना महाराष्ट्राने अनुभवला,त्याबद्दल पुढे…
“गीतरामायण-ज्योतीने तेजाची आरती”
श्रीराम-उभ्या राष्ट्राचे आराध्यदैवत! युगानुयुगांपासून आमच्या भारतीय मूल्यांचा,आदर्शांचा आणि जीवन जगण्याच्या एकूणच तत्वज्ञानाचा मूलाधार!! संपूर्ण भरतवर्षाला एकतेच्या सूत्रात गुंफणारा धागा!!! आणि आमचा धर्म, आमची संस्कृती अन् भारतीय म्हणून जगतात आमची जी ओळख आहे, त्याचे अधिष्ठान असणारा आमचा प्रातःस्मरणीय राष्ट्रपुरुष!!!
राम, राष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही बाबूजींचीही तीन दैवतं. या तीनही दैवतांची बाबूजींनी स्वकर्मकुसुमे अर्पून आजन्म, आमरण,आजीवन अर्चना केली. या व पुढील भागात त्यांच्या रामभक्ती, सावरकरभक्ती व राष्ट्रभक्तीचेच गान मी गाणार आहे.
दि.1 एप्रिल 1955.रामनवमी. आकाशवाणीवरुन गीतरामायणाचे ध्वनीक्षेपण सुरु झाले. सुमारे वर्षभर छप्पन आठवडे हे ध्वनीक्षेपण चालले. अन् त्याने महाराष्ट्रात ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास घडविला. तसे तर रामकथेचे प्रत्येक भारतीयाने बालपणापासूनच श्रवण केलेले असते. परंतू गीतरामायणातील आपल्या ओघवत्या, प्रासादिक शब्दांनी गदिमांनी आणि आपल्या तितक्याच मधूर, दैवी आवाज व रसाळ व भावमधूर चालींनी बाबूजींनी अख्ख्या महाराष्ट्राला रामरंगी रंगवून टाकले. कमीत कमी वाद्ये व वादकांमध्ये अप्रतिम चाली बांधणं, यात बाबूजींचा हातखंडा होता. गीतरामायण सुरु झाले की लोक रेडीओपूढे उदबत्ती लावून; गंध,फूले, अक्षता वाहून भक्तीभावाने बसत, असं जुन्या पिढीतील लोक सांगतात. गीतरामायण हे गदिमा व बाबूजी या दोघांच्याही आयुष्यातील एक अक्षय असे ऐश्वर्यपर्व आहे. कवी व गायक या दोघांनाही बावनकशी रामभक्ती व नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा लाभलेली असल्यामुळे गीतरामायणाच्या निमित्ताने त्यांची झालेली युती म्हणजे जणू मणिकांचन योगच.
गदिमांची गीते चांगली कि बाबूजींच्या चाली व आवाज चांगला असा पेच श्रोत्यांना पडून ‘येथ अलंकरले कवण कवणे, हे निर्वचेना’ अशी त्यांची अवस्था होवून जाते. सुरुवातीला सारी गाणी बाबूजींनीच गायलीत. त्यानंतर काही गाणी त्यांनी माणिक वर्मा, पं.वसंतराव देशपांडे, ललिता देऊळकर-फडके यांच्याकडून गाऊन घेतलीत तर काही त्यांनी स्वतः गायलीत. शब्द कसे उच्चारावेत, त्यातही ‘श’,’ष’,’क्ष’ हे शब्द कसे उच्चारावेत आणि गाण्यातून भावना कशा व्यक्त कराव्यात, याचा बाबूजी हे एक वस्तूपाठच होते. ‘स्वयें श्रीरामप्रभू ऐकती’ या गीतातील सुरुवातीचेच ‘श्रीराम….श्रीराम’ किंवा ‘प्रत्यक्ष’ हे शब्द ऐकतांना याची प्रचिती येते.
बाबूजींनी भारतभर व विदेशांत मिळून गीतरामायणाचे सुमारे 1800 कार्यक्रम केले. या कार्यक्रमांच्या वेळी सारे वातावरणच राममय होवून जाई. लक्ष्मणाकडून नाक कापले गेल्यानंतर रावणाच्या दरबारात शूर्पणखेने घातलेल्या गोंधळाचे सूड घे त्याचा लंकापती हे गीत बाबूजी इतक्या त्वेषाने म्हणत की त्या गाण्यानंतर त्यांना अक्षरशः धापा लागत व त्या गाण्यावर पाणी पिण्यासाठी अंतराळ म्हणून कार्यक्रमाचा मध्यांतर होई. ‘जय गंगे,जय भागिरथी! जय जय राम दाशरथि!!’ या गाण्याच्या वेळी श्रोते आपणच जणू प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांना बोटीत बसवून नेतोय अशा भावनेने हातात हात गुंफून डोलत आणि ‘सेतू बांधा रे!सेतू बांधा रे सागरी’ या गाण्यांच्या वेळी लोक अक्षरशः जागेवर नाचत.
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी त्यांना,पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा
पराधीन आहे जगती पुत्र माणसाचा
हे गाणं ऐकून रडला नाही, असा कुणी आजवर कुणाला सापडला कां हो ? आजही गीतरामायणाच्या कार्यक्रमांना मिळणारा उदंड प्रतिसाद ही या दोघांच्या ऐतिहासिक कामगिरीची व त्यांनी मराठी भावमनावर केलेल्या उपकाराची एक पावतीच आहे. ही गाणी इतकी गाजलीत की पूढे आसामी, बंगाली, हिंदी, इंग्रजी, कोंकणी, सिंधी, तेलुगू, ओडीया आणि कानडी या नऊ भाषांमध्येही त्यांची भाषांतरे झालीत. आधीच रामचरित्र गोड, त्यात गदिमांची रसाळ शब्दरचना, त्याला बाबूजींनी बांधलेल्या लाघवी चाली आणि त्यांनीच दिलेला दैवी, कर्णमधूर सूर. मग या शब्द-स्वर-सूरत्रयीची माधुरी काय वर्णावी! बाबूजींच्या एका गाण्यात म्हटल्याप्रमाणे जणू
तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा सूर की भास हा चांदण्याचा
अशीच अनुभूती श्रोत्यांना व्हायची. वाल्मिकी,कम्ब,तुलसीदासांच्या रांगेत स्थान देवून गदिमांना महाराष्ट्राने ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी देवून गौरविले.अन् अयोध्यावासीयांनी ज्याप्रमाणे कुश-लवांना कानांचे प्राण करुन ऐकले व गौरवले तद्वत उभ्या महाराष्ट्राने बाबूजींना डोक्यावर घेतले.गदिमांचे काव्य म्हणजे जणू ‘स्वयें श्रीरामप्रभू ऐकती’ या गीतात म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट आहे; तर या रामाने त्या रामाची गायलेली आरती म्हणजे ज्योतीने तेजाची आरती च आहे.(बाबूजींचे खरे नांव राम फडके).बाबूजी गातांना प्रत्यक्ष रामचंद्रही जणू उपस्थित राहत असावेत,इतकी ती स्वर्गीय अनुभूती असे. म्हणूनच म्हणावेसे वाटते-
स्वये श्रीरामप्रभू ऐकती
बाबूजी रामायण गाती
ज्योतीने तेजाची आरती
बाबूजी रामायण गाती.
बाबूजींच्या रामभक्तीचे गान इथेच थांबवतो.त्यांच्या राष्ट्रभक्तीविषयी पुढे…
मातृमंदिर में विभूषित दिव्य तव आराधना
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राम व राष्ट्र ही बाबूजींची तीन दैवते.मागील भागात रामभक्तीचे गायन झाले.आज त्यांच्या राष्ट्र व सावरकरभक्तीचे गान गाऊन माझ्या लेखणीला विराम देतो.
बाबूजी हे चित्रपटसृष्टीसारख्या दिखावू, झगमगाटी अन् बाह्यावडंबरी क्षेत्रात राहूनही अत्यंत साधे, नितीसंपन्न, ध्येयासक्त अन् व्रतस्थ असे तपस्वी जीवन जगू शकले याला कारण म्हणजे त्यांच्या अंतरीची राष्ट्रभक्ती आणि त्यांच्यावरील सावरकरी संस्कार.त्यांचे वडील निस्सीम सावरकरभक्त.त्यामुळे घरातच ‘राष्ट्रीय संस्कारांचे’ बाळकडू मिळाले.त्यातच लहानपणापासून संघशाखेवर जाणे सुरु झाले.संघातील विशुद्ध राष्ट्रभक्तीचे संस्कार, जाती-पातींच्या वर उठून सारा भारतीय समाज माझा आहे,ही समरसतेची शिकवण आणि आपला इतिहास,संस्कृती व आपले राष्ट्रपुरुष यांच्याबद्दलचा जाज्वल्ल्य पण सार्थ अभिमान सहजच त्यांच्याही अंगी उतरला. केवळ संस्कारांच्या गप्पा नाहीत तर आपल्या जीवनाचा अधिकाधिक वेळ प्रत्यक्ष राष्ट्रकार्यासाठी देणार्या अनेक संघप्रचारकांचा व गृहस्थ कार्यकर्त्यांचा जवळून सहवास लाभल्याने ‘परिसाच्या संगे लोह बि घडले,लोह बि घडले ते सुवर्णचि झाले.’ अनेक संघसमर्पित जीवनांच्या परिसस्पर्शाने बाबूजींचीही देशभक्ती केवळ बोलघेवडी न राहता प्रत्यक्ष कृतीशील झाली.बाबूजी आपल्या अत्यंत हालाखीच्या व धडपडीच्या काळात काही काळ धूळे जिल्ह्यातील शहाद्याला संघप्रचारक राहिलेत.
गोवा-दमण-दीव मुक्तीचा लढा हे तर बाबूजींच्या राष्ट्रजीवनातील एक सोनेरी पानच म्हणायला हवे. पोर्तुगीजांच्या सालाझारी राजवटीविरुद्ध ‘आझाद गोमांतक दला’ने आंदोलन उभारले होते. बाबूजी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदि संघाच्या अन्य हजारो स्वयंसेवकांनी यात उडी घेवून ‘संयुक्त मुक्ती आघाडी’ स्थापन केली. बाबूजींनी गानकोकिळा अन् स्वतः गोमंतककन्या असणार्या लता मंगेशकरांनाही यात आणले. २ मे १९५४ ला पुण्यातील हिराबागेत लतादीदींनी गोवा मुक्ती आंदोलनातील क्रांतीकारकांसाठी शस्रास्त्रे खरेदी करण्यासाठी निधी संकलित करता यावा यास्तव एक ‘संगीत-रजनी’ केली. १ऑगस्ट १९५४ च्या रात्री ‘आझाद गोमांतक दल’ व रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी सिल्व्हास्यात प्रवेश केला अन् मुक्तीलढ्यास एक निर्णायक रुप दिले. अखेर भारत सरकारने सैन्य पाठवून गोवा-दमण-दीवला १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केले आणि देशाला खर्या अर्थाने परदास्याच्या श्रुंखलांतून संपूर्णपणे मुक्त केले. गोवा मुक्ती आंदोलनातील स्वातंत्र्यसैनिक मोहन रानडे व डाॅ. मॅस्करहॅन्स हे लिस्बनच्या तुरुंगात खितपत पडले होते. या स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेसाठीही बाबूजींनी विश्वव्यापक आटापीटा केला.
बाबूजींच्या संवेदना केवळ सप्तसूरांपुरती किंवा काव्याशयापुरती मर्यादित नव्हत्या तर सभोवतीच्या समाजाचे कण्हणेही त्यांना ऐकू येई. सामाजिक समरसता ते प्रत्यक्ष जगत. स्वातंत्र्यानंतरही एका दलित स्त्रीची विवस्त्र धिंड काढल्याचे ऐकून अत्यंत व्यथित अंतःकरणाने त्यांनी मुंबईच्या हुतात्मा चौकात उपोषण केले होते.
श्रीरामजन्मभूमी मुक्तीलढ्याच्या वेळी तर बाबूजींनी वयाची सत्तरी ओलांडली होती. परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उमेदीने व उत्साहाने त्यांनी प्रत्यक्ष कारसेवेसाठी लढ्यात उडी घेतली. या वयात तो साहजिकच केवळ धार्मिक भावनेचा उन्माद नव्हता. रामजन्मभूमी मुक्तीलढा हा बाबूजींसाठी फक्त हजारो ओसाड देवालयांपैकी एकाचे राजकीय लाभासाठी चालवलेले आंदोलन नव्हते, तर ते आपल्या राष्ट्रीय अस्मितेच्या व अभिमानाच्या प्रतिकाच्या पुनःप्रस्थापनेचे रणशिंग होते. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीचा राष्ट्रीय मनावर उमटलेला जो ओरखडा होता, तो पुसून टाकून पुनश्च एकवार सत्वसंपन्न, स्वत्वसंपन्न व स्वाभिमानसंपन्न राष्ट्राच्या पुनर्निमितीची ती रणभेरी होती. बाबूजींच्या मते हा हिंदू-मुस्लिम असा लढा तर नव्हताच नव्हता. कारण बाबर वा राममंदिर ध्वंस करणारा मीर बाकी या परकीय आक्रमकांशी भारतीय हिंदूंचे जितके काहीच नाते नाही, तितकेच ते भारतीय मुस्लिंमाचेही नाहीच नाही. राम हाच प्रत्येक भारतीय हिंदूचा राष्ट्रपुरुष व प्रत्येक भारतीय मुस्लिमाचाही ‘ईमाम-ए-हिंद’ आहे, ही त्यांची दृढभावना होती.
बाबूजींच्या राष्ट्रप्रेमाचा कळसाध्याय म्हणजे ‘वीर सावरकर’ या चित्रपटाची निर्मिती. आपल्या यश-किर्ती, पुरस्कार आदिंनी भौतिकदृष्ट्या परिपूर्ण अशा जीवनातील शेवटच्या वर्षांमध्ये फक्त हा चित्रपट निर्मिणे हेच त्यांच्या जीवनाचे एकमेव साध्य उरले होते. खरे पाहता तेही एक साधनच होते. वीर विनायकाच्या उर्जस्वल व तेजःपुंज जीवनयज्ञापासून प्रेरणा घेवून नवा सशक्त, समर्थ व संपन्न भारत घडविण्याचे साधन. या चित्रपटासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. हा चित्रपट लोकाश्रय व लोकसहभागातूनच पूर्ण व्हावा, हे त्यांचे स्वप्न होते. समविचाराच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करणे, जगाच्या कानाकोपर्यातून निधी गोळा करणे, त्यासाठी दौरे, बैठकी व सांस्कृतिक कार्यक्रम करणे, पटकथा व दिग्दर्शनासाठी योग्य लेखक व दिग्दर्शक शोधणे, तंत्रज्ञ व कलाकारांची जुळवाजुळव करणे, अशा अनेक कामांची दगदग बहात्तर वर्षांचा हा ‘तरुण’ झपाटल्यागत करु लागला. खरंतर ‘गीतरामायणा’ चे कार्यक्रम करणे त्यांनी कधीच बंद केले होते. परंतु निधी उभारण्यासाठी पुन्हा सलग पाच पाच दिवस चार-चार तासांचे कार्यक्रम त्यांनी केलेत. शब्दशः रक्ताचे पाणी करुन बाबूजींनी हे ‘वीर सावरकर’ चे स्वप्न पूर्ण केले. स्वा.सावरकरांनी आपल्या ‘सागरा प्राण तळमळला’ मध्ये म्हटल्याप्रमाणे बाबूजींनी
गुणसुमने मी वेचियली या भावे
कि तिने सुगंधा घ्यावे.
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
या भावनेनी आपली सूर, स्वर, गायकी, चित्रपटनिर्मिती आदि सार्या गुणांची सुमने फक्त त्या ‘विनायका’ च्या चरणी अर्पण केलीत व अभ्युदयासोबत निःश्रेयसाची अर्थात भौतिक यशासोबत आध्यात्मिक समाधानाची प्राप्ती करुन एका परिपूर्ण व कृतकृत्य जीवनाची अनुभूती घेतली. म्हणूनच बाबूजींच्या राष्ट्रभक्तीला त्यांच्या सप्तस्वरांनी आधीच समृद्ध असलेल्या जीवनातला ‘आठवा स्वर’ म्हणावेसे वाटते.
प. पू. श्री गोळवलकर गुरुजींचे यथार्थ वर्णन असणारे ‘चाहिये आशीष माधव’ हे गीत बाबूजींनी गायले आहे. खरे तर त्यातील वर्णन बाबूजींनाही चपखल बसते. त्याच गीतातील दोन कडव्यांनी या लेखमालेची सांगता करतो.
शत्रू को भी जितता था
आपका चारित्र्य उज्वल
निंदकों पर मात करता
आपका व्यवहार निर्मल।
मातृभू की वेदना
जो आपके ऊर में बसी थीं
पा सके अल्पांश भी तो
पूर्ण होंगी साधना।।
देवइंगित पर तुम्हारे
ध्येयपथ पर बढ रहें हैं
आपसे ज्योतित अनेकों
दीप अविचल जल रहें हैं।
राष्ट्रजीवन का गहन तम
शीघ्र ही मिटकर रहेंगा
मातृमंदिर में विभूषित
दिव्य तव आराधना।।
🇮🇳 ।।भारत माता की जय।। 🇮🇳
By Dr. Sachin Jambhorkar
Consultant Anaesthesiologist & Pain Specialist,
National Cancer Institute, Nagpur.